वनसडीत पुन्हा डोकं वर काढणाऱ्या अवैध मटक्यावर टाळा ठोका; राकेश राठोड यांची कोरपना पोलिसांकडे जोरदार मागणी
वनसडी परिसरात अवैध मटका-सट्टापट्टी तात्काळ बंद करा!
शिवसेना तालुकाप्रमुख राकेश राठोड यांची कोरपना पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
Oplus_16908288
वनसडी / कोरपना: मोहब्बत खान ✍️
अनेक वर्षांपासून पूर्णपणे बंद असलेला अवैध सट्टापट्टी आणि मटक्याचा व्यवसाय वनसडी परिसरात अचानक पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिक प्रचंड हैराण आणि त्रस्त झाले आहेत. या बेकायदेशीर व्यवसायामुळे परिसरातील शांतता धोक्यात आली असून, तरुण वर्ग व सामान्य नागरिक या जुगाराच्या विळख्या अडकत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत वनसडी परिसरातील अवैध मटका व सट्टापट्टी तात्काळ बंद करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी शिवसेना प्रमुख राकेश राठोड यांनी केली आहे.
याप्रकरणी राकेश राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोरपना पोलीस स्टेशन गाठून पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वनसडी आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध मटका व सट्टापट्टीचे जाळे अचानक सक्रिय झाले आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला हा धंदा पुन्हा सुरू झाल्याने परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या सट्ट्याच्या व्यसनामुळे अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
”शांतताप्रिय वनसडी परिसरात बेकायदेशीर मटका आणि सट्टापट्टी चालवून नागरिकांची आणि तरुणांची दिशाभूल केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अवैध धंदे चालवणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी. हा व्यवसाय पूर्णपणे बंद न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा तालुका प्रमुख राकेश राठोड यांनी दिला आहे.
आता कोरपना पोलीस या बेकायदेशीर मटका आणि सट्टापट्टीवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.