कोरपना पोलिसांचा दणका ठरला तात्पुरता? वनसडीत सट्टापट्टी पुन्हा सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा!
कारवाई झाली, पण जुगार थांबला नाही! वनसडी परिसरात सट्टापट्टीचे जाळे पुन्हा सक्रिय? ठोस व कायमस्वरूपी कारवाईची मागणी
वनसडी / कोरपना:
वनसडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघडपणे सुरू असलेल्या अवैध सट्टापट्टी व मटका व्यवसायाविरोधात बातमी प्रसिद्ध होताच आणि शिवसेना तालुकाध्यक्ष राकेश राठोड यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर कोरपना पोलीस स्टेशनने तातडीने हालचाली करत कारवाईचा बडगा उगारला होता. पोलिसांच्या या प्राथमिक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, ही कारवाई केवळ दाखवण्यापुरतीच होती की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण वनसडी परिसरात सट्टापट्टीचा धंदा पुन्हा ‘जैसे थे’ सुरू झाल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
बातमीची दखल घेऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काही काळ सट्टा चालवणारे भूमिगत झाले होते. परंतु, आता पुन्हा छुपेपणाने आणि नव्या क्लृप्त्या वापरून हा बेकायदेशीर सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
❓ कारवाईचा धाक संपला की गुप्त संमती?
अनेक वर्षांपासून बंद असलेला हा जुगाराचा धंदा अचानक सुरू झाल्याने नागरिक आधीच त्रस्त होते. पोलिसांच्या कारवाईनंतर हा प्रकार समूळ नष्ट होईल अशी आशा वनसडीकरांना होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच सट्टापट्टीचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांच्या कारवाईच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सट्टा चालवणाऱ्यांना पोलिसांचा धाक उरला नाही की छुप्या मार्गाने पाठबळ मिळत आहे? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
”आम्ही निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते आणि त्यांनी कारवाई देखील केली. परंतु, जर सट्टापट्टी पुन्हा छुप्या मार्गाने सुरू होत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी केवळ थातूरमातूर कारवाई न करता मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन हा धंदा कायमचा मुळासकट उपटून टाकावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— राकेश राठोड, तालुकाध्यक्ष (शिवसेना)
कायमस्वरूपी बंदोबस्ताची गरज
या बेकायदेशीर मटका आणि सट्टापट्टीमुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या व जुगाराच्या गर्तेत अडकत असून अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत आहे. त्यामुळे कोरपना पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन केवळ नावाला कारवाई न करता, सट्टापट्टी चालवणाऱ्यांवर कायमस्वरूपी व कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वनसडी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.




