Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, सूर्यफूल व जवस या पिकांची निवड करा

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा लक्षणीय कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषतः हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, सूर्यफूल व जवस या पिकांची निवड करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कमी पाण्याच्या परिस्थितीत हरभरा व जवस ही पिके शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतात. या पिकांचा कालावधी साधारणतः 100 ते 120 दिवसांचा असून, कमी ते मध्यम पाण्याच्या उपलब्धतेत त्यांची लागवड करता येते. तसेच करडई व रब्बी ज्वारी ही साधारणतः 110 ते 125 दिवसांची पिके असून कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य आहेत. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध ओलावा विचारात घेऊन सूर्यफूल पिकाचाही पर्याय निवडता येऊ शकतो.

दुष्काळसदृश परिस्थितीत गहू व मका यांसारख्या तुलनेने अधिक पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांची लागवड टाळावी. त्याऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी. पीक निवडताना शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घ्यावे.

जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 61.91 टक्के पाऊस : चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1143 मिलिमीटर असून मागील वर्षी 1298 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र जिल्ह्यात केवळ 700 मिलिमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 61.91 टक्के आहे. अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी होण्याबरोबरच सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पिकांची निवड करताना शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

गतवर्षी 1.23 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड : सन 2025-26 च्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण 1 लाख 22 हजार 930 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये कडधान्य पिकांचे 94 हजार 565 हेक्टर, तृणधान्य पिकांचे 25 हजार 819 हेक्टर, तर गळीतधान्य पिकांचे 2 हजार 545 हेक्टर क्षेत्र होते. मात्र यंदा पावसाच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामातील पीक पद्धतीत आवश्यक बदल करणे गरजेच आहे.

रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करा : जिल्ह्यातील सध्याची पर्जन्यस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच रब्बी पिकांची पेरणी करावी. कमी कालावधीची, कमी पाण्यावर येणारी आणि स्थानिक परिस्थितीस अनुकूल असलेली पिके निवडावीत. योग्य पीक नियोजन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास दुष्काळसदृश परिस्थितीतही संभाव्य पीक नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!