कोरपना येथे पोक्सो कायदा व विविध कायद्यांवर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न!
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती
कोरपना:
तालुका विधी सेवा समिती, कोरपना यांच्या वतीने आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी येथील स्व. प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालय, कोरपना येथे ‘पोक्सो कायदा’ तसेच विविध महत्त्वपूर्ण कायद्यांविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याचे सखोल ज्ञान, त्यांचे कायदेशीर हक्क आणि कर्तव्यांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मेश्राम सर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून बार असोसिएशन, कोरपनाचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे आणि ॲड. अर्पित धोटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कायद्याची माहिती आणि हक्कांची जाणीव काळाची गरज: ॲड. श्रीनिवास मुसळे
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. श्रीनिवास मुसळे यांनी आपल्या मार्गभाषणात ‘पोक्सो कायदा’ (POCSO Act) चे महत्त्व, बालकांचे संरक्षण, अल्पवयीन मुला-मुलींचे कायदेशीर हक्क आणि आजच्या समाजात कायद्याविषयी जागरूकता असणे का गरजेचे आहे, यावर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा आणि गैरसमजांपासून दूर राहून कायद्याची योग्य माहिती करून घ्यावी आणि आपल्या हक्कांबाबत नेहमी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणिवा प्रगल्भ होऊन सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अतिशय आकर्षक व नेटके सूत्रसंचालन ॲड. मोहितकर साहेब यांनी केले, तर आभार प्रदर्शन बार असोसिएशन, कोरपनाचे सचिव ॲड. पवार यांनी मानले.
या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक ठरला.




