आठवडाभर नव्हे, दोन महिन्यांहून अधिक काळापासून गणेश वरखडे बेपत्ता!
पडोली पोलिसांकडून शोधमोहीम सुरू; ओळख पटवून देण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
चंद्रपूर: घरातून अचानक निघून गेलेले ५१ वर्षीय गणेश नामदेव वरखडे अद्याप बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी पडोली पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ८ सप्टेंबर २०२६ रोजी ते कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. मात्र, बराच कालावधी उलटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
यासंदर्भात त्यांच्या पत्नी कविता गणेश वरखडे, रा. आमटावार्ड, पडोली, ता. जि. चंद्रपूर यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी पडोली पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट दिला. त्यानंतर पोलिसांकडून बेपत्ता गणेश वरखडे यांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन :
गणेश नामदेव वरखडे यांचे वय ५१ वर्षे असून रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, चेहरा लांबट आणि केस काळे-पांढरे आहेत. घरातून निघताना त्यांच्या अंगात पिवळ्या रंगाचा फुलशर्ट व काळ्या रंगाची फुलपँट होती.
आपल्या एका माहितीने कुटुंबीयांना मिळू शकतो मोठा दिलासा!
वरील वर्णनाची व्यक्ती कुठेही आढळून आल्यास अथवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पडोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल राठोड (मो. ९९२३९८२२१७) यांना माहिती देण्याचे आवाहन पडोली पोलीस ठाणेदार यांनी केले आहे.
बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




