Sunday, November 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्ह्यातील ३,७४७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र!

चंद्रपूर जिल्ह्यातील ३,७४७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ओटीएसची पहिली यादी जाहीर; पात्र शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतचा लाभ

चंद्रपूर : शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३ हजार ७४७ शेतकरी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ओटीएस घटकाची पहिली यादी जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेत संपूर्ण कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक समाविष्ट आहेत. ओटीएसच्या पहिल्या यादीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २ हजार ९६२ शेतकऱ्यांचा, तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील ७८५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ५३ हजार ४७३ शेतकऱ्यांना लाभ

योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या टप्प्यात राज्यातील २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५३ हजार ४७३ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ओटीएस योजनेच्या माध्यमातून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्शाची रक्कम भरावी

ओटीएस योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कर्जातील स्वतःच्या हिश्शाची निर्धारित रक्कम संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने ही रक्कम भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत, बँक शाखा तसेच विकास संस्थांच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखात्याचा तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार निर्धारित रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाचा तपशील नमूद करण्यात आला आहे.

३१ मार्च २०२७ पर्यंत रक्कम भरण्याची मुदत

पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपला तपशील काळजीपूर्वक तपासून स्वतःच्या हिश्शाची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी नमूद रक्कम संबंधित कर्जखात्यात भरावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही कर्जखात्यात ही रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांच्या हिश्शाची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. बँकांकडून दर शुक्रवारी रक्कम भरल्याची अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे.

आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीचा लाभ

शेतकऱ्याने स्वतःच्या हिश्शाची रक्कम जमा केल्यानंतर बँकेकडून थकबाकीची माहिती अद्ययावत करण्यात येईल. त्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केली आहे आणि आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाचा दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येईल. शासनाकडून रक्कम वर्ग झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

दरम्यान, ओटीएस योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पुढील काळातही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन : ओटीएस योजनेच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, संबंधित बँक किंवा विकास संस्थेकडे जाऊन आपल्या कर्जखात्याची व भरावयाच्या रकमेची खात्री करून घ्यावी. अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक रक्कम जमा करून अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून शासनाच्या कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही.

Popular Articles

error: Content is protected !!