कोरपना शहरात ‘ज्वेलर्स’च्या नावाखाली सावकारी पाश; वेळेत पैसे न भरल्यास सोन्यावर टाकला जातोय दरोडा!
साप्ताहिक कोरपना एक्सप्रेसचा दट्ट्या: परवाना नसतानाही व्याजाचा धंदा तेजीत; शेतकरी वर्गाची मोठी लूट
✍️मोहब्बत खान
कोरपना: कोरपना शहरात सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या नावाखाली गरिबांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची लूट करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी किंवा बियाणे खरेदीसाठी मोठ्या आशेने आपले मौल्यवान दागिने गहाण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना, येथील काही ज्वेलर्स दुकानदार चक्क लुबाडत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ‘मुदत संपली की दागिना आमचा’ अशा बेकायदेशीर अटी लावून लाखो रुपयांचे सोने हडपण्याचे सत्र सुरू असून, याविरोधात साप्ताहिक “कोरपना एक्सप्रेस” आता मैदानात उतरल आहे.
अनेक नागरिक ५० हजार ते १ लाखाचे दागिने आपत्कालीन परिस्थितीत या दुकानदारांकडे गहाण ठेवतात. मात्र, एखाद वेळेस ठरलेल्या मुदतीत पैसे परत करण्यास विलंब झाला, तर हे दुकानदार थेट दागिन्यांवर आपला मालकी हक्क सांगून ते दागिने परत देण्यास नकार देतात. वास्तविक पाहता, गहाण ठेवलेली वस्तू जप्त करण्याचा किंवा ती स्वतःच्या मालकीची करून घेण्याचा अधिकार कोणत्याही वैयक्तिक दुकानदाराला नसतो, जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकृत सावकारी परवाना नसेल.
शेतकरी वर्गाला टार्गेट
कोरपना परिसर हा प्रामुख्याने शेतीप्रधान आहे. पेरणीच्या काळात खते आणि बियाणांसाठी पैशांची नड भासल्यास शेतकरी घरातील सोनं गहाण ठेवतात. याच हतबलतेचा फायदा काही ज्वेलर्स चालक घेत आहेत. कर्जदाराने व्याजासह मुद्दल देण्याची तयारी दर्शवूनही ‘वेळ निघून गेली’ असे कारण सांगून त्यांना हुसकावून लावले जात आहे.
कायदेशीर नियमांची पायमल्ली
👉 सावकारी परवाना: गहाण मालावर कर्ज देणाऱ्याकडे सरकारचा अधिकृत सावकारी परवाना असणे अनिवार्य आहे. कोरपण्यातील किती ज्वेलर्सकडे हा परवाना आहे, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.
👉 व्याजदर: नियमापेक्षा जास्त व्याज आकारून लोकांची पिळवणूक केली जात आहे.
👉 मालकी हक्क: मुदत संपली तरी दागिना लिलाव करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया असते, मात्र येथे थेट ‘दरोडा’ टाकल्यासारखी परिस्थिती आहे.
”शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून घेतलेले सोने असे बेकायदेशीरपणे हडपणाऱ्या ज्वेलर्सची खैर केली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ संबंधित दुकानदारांचे परवाने तपासावेत आणि पीडित नागरिकांना त्यांचे दागिने परत मिळवून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— संपादक, साप्ताहिक कोरपना एक्सप्रेस
प्रशासनाला इशारा!
साप्ताहिक “कोरपना एक्सप्रेस” या माध्यमातून संबंधित विभागाचे लक्ष वेधत आहे की, कोरपना शहरातील सर्व ज्वेलर्सच्या दुकानांची झाडाझडती घेऊन त्यांच्याकडे असलेल्या सावकारी परवान्यांची तपासणी करावी. ज्यांच्याकडे परवाना नाही आणि जे ग्राहकांना धमकावून सोने हडपत आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
लवकरच या लुटीचा सविस्तर पर्दाफाश ‘कोरपना एक्सप्रेस’च्या पुढील अंकात!






