मुलींच्या शिक्षणाला बळ, बालविवाहाला आळा!
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत जनजागृती
गडचांदूर : मुलींचे शिक्षण, महिला व बालकांचे संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि हुंडाबंदी याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देव सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कु. मनीषा पाचभाई, परिविक्षा अधिकारी अतिश कुमार चव्हाण, परिविक्षा अधिकारी कु. सायली पाटील, तालुका संरक्षण अधिकारी प्रदीप भोंगळे, समुपदेशक कु. प्रिया पिंपळशेंडे, मनीषा देठे, केस वर्कर कल्पना फुलझले यांच्यासह पंचायत समिती कोरपना प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बालविवाह, हुंडा प्रथा आणि मुलींच्या शिक्षणावर मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान महिलांचे संरक्षण, बालकांचे हक्क, बालविवाहाचे दुष्परिणाम, हुंडा प्रथा प्रतिबंध, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व तसेच महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना रुजविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांना प्रतिबंध घालणे यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिला व बालकांचे संरक्षण तसेच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.




