बल्लारपुरात विनापरवाना औषध विक्रीचा पर्दाफाश; ‘कस्तुरवार मेडिकल’वर धाड, तरीही विक्री सुरूच?
बल्लारपूर: शहरातील शिवनगर वॉर्डातील पेपरमिल ३ एक्का गेट समोरील मे. कस्तुरवार मेडिकल स्टोअर्स येथे विनापरवाना अॅलोपॅथिक औषधांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली असली तरी, अद्याप दुकान सुरूच असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
औषध निरीक्षक श्रीमती नालंदा भा. उरकुडे आणि सहाय्यक आयुक्त श्री. सु. ता. सावंत यांनी १२ मार्च २०२६ रोजी सदर मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली. या तपासणीत सुनिल शामराव कस्तुरवार हे कोणताही अधिकृत परवाना नसताना अॅलोपॅथिक औषधांची सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले. तपासणी अधिकाऱ्यांनी तात्काळ औषध साठा जप्त केला आहे.
नागरिकांचे अनुत्तरीत प्रश्न: प्रशासनाने औषध साठा जप्त केला असला तरी, या प्रकरणामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:
डिस्ट्रीब्युटर कोण?: जर संबंधित मेडिकलकडे परवाना नाही, तर त्यांना औषध साठा पुरवणारे अधिकृत डिस्ट्रीब्युटर कोण आहेत?
नियम धाब्यावर: विनापरवानाधारकाला औषध पुरवठा करणे हे कायद्याने गुन्हा असताना, घाऊक विक्रेत्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले?
दुकान अजूनही सुरूच?: कारवाई होऊन औषध साठा जप्त केल्यानंतरही सदर दुकान अद्याप सुरू कसे आहे? यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांचे ‘बॅकएंड’ सप्लायर्स शोधणे आता गरजेचे झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना चाप बसणार का, याकडे बल्लारपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.






