कोरपना तालुक्यातील जिनिंगमधील मृत्यू प्रकरणाला मोठे वळण; कामगार आयुक्तांकडून चौकशी, मालकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू
कोरपना एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला यश; मृत कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे संकेत
कोरपना: मोहब्बत खान ✍️
कोरपना तालुक्यातील विदर्भ जिनिंग (जेवरा) आणि नंदिविजय जिनिंग (सोनुली) येथे अल्पावधीत घडलेल्या दोन कामगारांच्या मृत्यूच्या घटनांनंतर आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कोरपना एक्सप्रेसचे संपादक मोहब्बत खान यांनी संबंधित विभागांकडे केलेल्या तक्रारीनंतर सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी चौकशी करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी दोन्ही घटनांनी राज्यभर खळबळ उडवली होती. जेवरा येथील विदर्भ जिनिंगमध्ये एका कामगाराचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सोनुली येथील नंदिविजय जिनिंगमध्येही ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याने जिनिंगमधील कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
कामगार आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जिनिंगची प्रत्यक्ष पाहणी करून विविध कामगार कायद्यांअंतर्गत तपास करण्यात आला. मृत कामगारांच्या वारसांना श्रमिक नुकसानभरपाई अधिनियम, १९२३ अंतर्गत नुकसानभरपाई मिळावी यासाठी कामगार न्यायालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
याशिवाय प्राथमिक चौकशीत आढळलेल्या त्रुटींवरून संबंधित मालक व कंत्राटदारांविरुद्ध किमान वेतन अधिनियम तसेच वेतन प्रदान अधिनियम अंतर्गत न्यायालयात खटलेही दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रात नमूद आहे.
दरम्यान, कोरपना एक्सप्रेसने केलेल्या निवेदनात दोन्ही जिनिंग मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे, तालुक्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग कारखान्यांचे सुरक्षा ऑडिट, मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकरणामुळे कोरपना तालुक्यातील जिनिंग उद्योगातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुढील काळात प्रशासन कोणती कठोर पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




