Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

१० ते १५ लाखांच्या सुगंधित तंबाखूवर केवळ १८ हजारांचा सवंगडोपचार! कोरपना पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह; वाहनाचे नंबरही ‘बनावट’?

१० ते १५ लाखांच्या सुगंधित तंबाखूवर केवळ १८ हजारांचा सवंगडोपचार! कोरपना पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह; वाहनाचे नंबरही ‘बनावट’?

​कोरपना (चंद्रपूर): अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या अधिकारांवर परस्पर अतिक्रमण करत आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या एका कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १० ते १५ लाख रुपयांचा कोट्यवधींचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करूनही केवळ १८ हजारांची किरकोळ कारवाई उरकणे, मुख्य सूत्रधाराला अभय देणे आणि एफआयआरमध्ये चक्क ‘MH 34 CD 91920’ असा चुकीचा व संशयास्पद वाहन क्रमांक नोंदवून शासनाची दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

​कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २५/०७/२०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली होती. खुद्द कोरपना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई पार पाडताना पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाला (FDA) पूर्णपणे डावलले: सुगंधित तंबाखू बाळगणे आणि विकण्याबाबतच्या कायदेशीर कारवाईचे अधिकार केवळ अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे आहेत. असे असतानाही पोलिसांनी एफडीएला विश्वासात न घेता परस्पर कारवाई केली आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते.

​बनावट व चुकीचा वाहन क्रमांक: पकडलेल्या वाहनाची खरी ओळख लपवण्यासाठी आणि पोलीस दलासह शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने एफआयआरमध्ये ‘MH 34 CD 91920’ असा चुकीचा क्रमांक टाकण्यात आल्याची दाट शंका व्यक्त केली जात आहे.

​भारतीय न्याय संहितेला (BNS) फाटा: गंभीर स्वरूपाचे कायदेशीर गुन्हे दाखल करण्याऐवजी अत्यंत संशयास्पद पद्धतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.

​मुख्य सूत्रधार मोकाट, केवळ चालकावर मलमपट्टी: वाहनात प्रत्यक्षात १० ते १५ लाख रुपयांचा उच्च दर्जाचा सुगंधित तंबाखूचा साठा असतानाही, तो मुख्य मालक व तंबाखू सोडून देण्यात आला. केवळ वाहन चालकावर १८,००० रुपयांची दंडात्मक कारवाई दाखवून मोठा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न झाला आहे.

​आर्थिक व्यवहारातून पोलीस यंत्रणेचा गैरवापर?

​एवढा मोठा बेकायदेशीर मुद्देमाल सापडला असताना केवळ कागदोपत्री खानापूर्ती करणे आणि प्रत्यक्ष आरोपीला सुरक्षित बाहेर काढणे, यामागचे गुपित काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा कोरपना तालुक्यात रंगली आहे.

​शासनाच्या महसुलाला आणि अन्न सुरक्षेला खिंडार पाडणाऱ्या या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून यामागे असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Popular Articles