Sunday, November 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी पुन्हा संधी!

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी पुन्हा संधी!

पात्र मतदारांना अंतिम यादीत नाव समाविष्ट करण्याची निवडणूक आयोगाकडून संधी; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन

चंद्रपूर: विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेदरम्यान विविध कारणांमुळे प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदीच्या कारणास्तव प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या पात्र नागरिकांना आता आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन सादर करून अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेता येणार आहे. त्यामुळे मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारत निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत गणना प्रपत्र वितरित होऊनही विविध कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, ग्रामपंचायत कार्यालये, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत उपलब्ध राहणार आहे. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही ती प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

पूर्वीच्याच पत्त्यावर वास्तव्यास असलेले मतदार : गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-B मधील निवेदन सादर करावे. यापूर्वी गणना प्रपत्र सादर न करण्याचे कारण त्यात नमूद करणे आवश्यक आहे.

राज्यांतर्गत स्थलांतरित मतदार : नवीन पत्ता व विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करून परिशिष्ट-C मधील निवेदन आणि नवीन पत्त्याचा पुरावा सादर करावा. यासाठी स्वतंत्रपणे नमुना क्रमांक ८ (Form-8) देण्याची आवश्यकता नाही.

घरबसल्या डाउनलोड करता येणार गणना प्रपत्र!

मतदारांना त्यांच्या जुन्या मतदार छायाचित्र ओळखपत्रावरील (EPIC) क्रमांकाचा वापर करून भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अथवा ECINET ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करता येणार आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी ‘Book a Call with BLO’ ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी ज्या नागरिकांनी यापूर्वीच नमुना क्रमांक ६ (Form-6) सादर केला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

BLO मार्फत मतदारांशी संपर्क; पडताळणीनंतर अंतिम यादीत नाव!

संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांशी संपर्क साधण्यात येणार असून, त्यांना आवश्यक मार्गदर्शन व गणना प्रपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची नियमानुसार तपासणी व पडताळणी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

मतदारांनी निष्काळजीपणा टाळावा!

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून, कोणताही पात्र नागरिक या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तातडीने खात्री करणे गरजेचे आहे. नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रांसह विहित पद्धतीने गणना प्रपत्र व संबंधित निवेदन सादर करावे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!