आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची सुवर्णसंधी!
शासनाकडून मोफत मार्गदर्शनासह दरमहा १ हजार रुपये विद्यावेतन; १ डिसेंबरपासून वर्गांना सुरुवात
चंद्रपूर : अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. चंद्रपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात १ डिसेंबर २०२६ पासून या विशेष प्रशिक्षण वर्गांना सुरुवात होणार आहे.
वर्ग-३ व वर्ग-४ पदांच्या परीक्षांसाठी विशेष तयारी
सदर मार्गदर्शन वर्ग १ डिसेंबर २०२६ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी या विषयांचे सखोल मार्गदर्शन अनुभवी मार्गदर्शकांमार्फत केले जाणार आहे. विशेष म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांना अभ्यासासाठी चार पुस्तकांचा संच देण्यासोबतच दरमहा १ हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी २६ नोव्हेंबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रतींसह नोंदणी अर्ज कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुकची छायाप्रत जोडावी लागणार आहे.
नोंदणी केलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, चंद्रपूर येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. ९७६४५८०९८६) यांच्याशी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील पात्र आदिवासी युवक-युवतींनी या शासकीय उपक्रमाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी साधावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहे.




