Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला नवी झेप!

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला नवी झेप!

 शेतकरी भवन, आधुनिक गोदाम व व्यापारी संकुलाच्या कामांचे भूमिपूजन; खुल्या लिलाव शेडचे लोकार्पण

माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ; शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या प्रगतीला मिळणार नवी दिशा!

राजुरा: शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि व्यापारवृद्धीला चालना देण्याच्या दृष्टीने राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने विकासाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बाजार समितीच्या प्रांगणात प्रस्तावित शेतकरी भवन, आधुनिक गोदाम आणि व्यापारी संकुलाच्या कामांचे भूमिपूजन, तसेच नवनिर्मित खुल्या लिलाव शेडचे लोकार्पण माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्त्वाची दुवा असून शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, सुरक्षित साठवणूक व्यवस्था आणि आवश्यक मूलभूत सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी भवन, आधुनिक गोदाम आणि व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विकासकामांमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय व बाजार समितीविषयक कामांसाठी स्वतंत्र सुविधा मिळणार असून शेतीमालाच्या साठवणुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच व्यापारी संकुलामुळे स्थानिक व्यापाराला नवी संधी उपलब्ध होऊन बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आधुनिक बाजारपेठ आवश्यक – सुभाषभाऊ धोटे

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषी उत्पन्न बाजार समितीचा खरा आत्मा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळण्यासाठी केवळ उत्पादन वाढणे पुरेसे नाही, तर त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी सक्षम बाजारपेठ, सुरक्षित साठवणूक व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी भवन, गोदाम, व्यापारी संकुल आणि लिलाव शेडच्या स्वरूपात होत असलेला विकास निश्चितच समाधानकारक आहे. या सुविधांचा लाभ शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती या तिन्ही घटकांना होईल. बाजार समितीचा विकास केवळ इमारतींच्या उभारणीपुरता मर्यादित न राहता तो शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेला असला पाहिजे. भविष्यातही शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, बाजार समितीचे सभापती तिरुपती मलय्या इंदुरवार यांनी आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनातून बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांचा आराखडा सादर केला. नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्यासह उपस्थित संचालकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तिरुपती मलय्या इंदुरवार होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, उपसभापती संजय पावडे, संचालक अॅड. अरुण धोटे, विकास देवाळकर, उमाकांत धांडे, विनोद झाडे, दिलीप देठे, गोपाल झंवर, नवनाथ पिंगे, राकेश हिंगाने, लहू बोंडे, सरिता रेड्डी, जगदीश बुटले, प्रफुल कावळे, आशिष नलगे, विठाबाई झाडे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेणेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, राधेश्याम अडानीया, गोपाल सारडा, विष्णुप्रसाद नवंधर, अजय रेड्डी, संतोष गटलेवार, नगरपरिषद सभापती अनंता ताजने, पूनम गिरसावळे, नगरसेवक इंदूबाई निकोडे, निता बानकर, एजाज अहमद, अभिजीत धोटे, राजाराम येल्ला, भूषण बानकर, मनीष येरणे, अनिल आलाम, तुकाराम माणूसमारे, कवडू सातपुते, कोमल फुसाटे, धनराज चिंचोलकर तसेच आर्किटेक्ट रवी पचारे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीच्या सचिव मोनिका मेश्राम यांनी केले. संचालन संचालक गोपाल झंवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक पराग बोढे यांनी मानले. यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, मापारी आणि हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या विकासकामांमुळे शेतकऱ्यांना अधिक सक्षम बाजारपेठ, व्यापाऱ्यांना नव्या व्यावसायिक संधी आणि कृषी व्यापाराला आधुनिक पायाभूत सुविधांची जोड मिळणार असून राजुराच्या कृषी विकासाच्या वाटचालीत हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles

error: Content is protected !!