शेतकरी संघटनेच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात; शेतकरी, बेरोजगार व ग्रामीण प्रश्नांवर शासनाविरोधात एल्गार!
कोरपना: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या, कापसाला योग्य भाव, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बेरोजगार युवकांचे प्रश्न तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज, शुक्रवार दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी कोरपना येथे भव्य जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामुळे तालुक्यातील विविध प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून शेतकरी, युवक आणि ग्रामीण जनतेच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींपासून ते गावपातळीवरील रस्ते, पाणी, वीज, अतिक्रमण आणि ग्रामपंचायतींच्या पुनर्रचनेपर्यंत विविध प्रश्नांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्याच्या धोरणाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे कापसाच्या भावावर परिणाम झाल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे. कापसाला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांपर्यंत कमी भाव मिळत असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, सोयाबीनचे हमीभावाने खरेदी तसेच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज जोडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवरही आक्रमक भूमिका
या मोर्चाच्या माध्यमातून कोरपना तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांची दुरुस्ती, पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, ग्रामीण भागातील वीज व पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडविणे, तसेच बेरोजगार स्थानिक युवकांना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय महसुली जमिनीवरील अतिक्रमण, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, गावांच्या पुनर्रचनेतून नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती, तलाव व जलसंधारणाची कामे आणि शेतकऱ्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसह विविध स्थानिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.
मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला आणि ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता केंद्र व राज्य सरकार तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी संघटनेची भूमिका आहे. कोरपना बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली असून मकसूद भाई यांच्या खुल्या प्लॉटवर, आंबेडकर चौकाजवळ मोर्चाच्या समारोपानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्रजी हरणे, युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. दीपक चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश मोहिंतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव घांडे, माजी अध्यक्ष सतीश दाणे, जिल्हाध्यक्ष अरुण पा. नवले, निकुंज पा. कोरंजे, पौर्णिमा निरंजने, ज्योत्स्ना मोहिंतकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळणार का?
शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या विविध मागण्यांसाठी आयोजित हा जनआक्रोश मोर्चा शासन व प्रशासनाचे कितपत लक्ष वेधून घेतो आणि या मागण्यांवर कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




