सणासुदीच्या तोंडावर अन्नभेसळीचा पर्दाफाश!
FDA ची चंद्रपुरात धडक कारवाई; ३६ लाखांचा ८,९८८ किलो अन्नसाठा जप्त!९२ आस्थापनांची तपासणी, ५१ विक्रेत्यांना सुधारणा नोटीस; १० आस्थापनांचे परवाने निलंबित
चंद्रपूर |
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांची मागणी वाढत असतानाच अन्नपदार्थांच्या शुद्धतेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चंद्रपूर जिल्ह्यात धडक मोहीम राबवित तब्बल ३६ लाख रुपये किमतीचा ८,९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अन्न व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खाद्यतेल, खवा, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, विविध मसाले, गूळ, शेंगदाणे आणि चहा पावडर अशा दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांचा जप्त साठ्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने तपासणीची प्रक्रिया हाती घेतली आहे.
९२ आस्थापनांची तपासणी; ५१ जणांना नोटिसांचा दणका!
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेतले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. तर १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत.
प्रश्न असा आहे की, नागरिकांच्या ताटात जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवली जाते का? सणासुदीच्या काळातच नव्हे, तर वर्षभर अशा तपासणी मोहिमांची गरज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
सात महिन्यांचा कारवाईचा लेखाजोखा धक्कादायक!
१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम राबविली.
या कालावधीतील कारवाईची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
👉 २४३ अन्न आस्थापनांची तपासणी.
👉 ३१६ अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
👉 २१० नमुने प्रमाणित घोषित.
👉 ९६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित.
👉 ३ नमुने कमी दर्जाचे आढळले.
👉 ५ नमुने मिथ्याछाप घोषित.
👉 २ नमुने असुरक्षित घोषित.
👉 १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस.
👉 १० आस्थापनांचे परवाने निलंबित.
👉 २९ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई.
👉 २ लाख २० हजार रुपये दंड वसूल.
याशिवाय आठ प्रकरणे न्यायनिर्णयासाठी सह आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाखल करण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू आहे.
केवळ सणासुदीलाच कारवाई नको; कायमस्वरूपी नियंत्रण हवे!
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे म्हणजे थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या आहारात अशा अन्नपदार्थांचा समावेश होत असतो. त्यामुळे भेसळीच्या संशयावरून जप्त केलेल्या अन्नसाठ्याची प्रयोगशाळा तपासणी, दोषींवरील कारवाई आणि प्रकरणांचा निकाल याबाबत प्रशासनाने पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.
केवळ सणासुदीच्या काळात धडक मोहीम राबवून चालणार नाही, तर बाजारपेठांमध्ये नियमित तपासणी, विक्रेत्यांच्या परवान्यांची पडताळणी आणि संशयास्पद अन्नपदार्थांवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
नागरिकांनो, भेसळ दिसल्यास तक्रार करा!
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी.
टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५
ऑनलाइन तक्रार : FDA महाराष्ट्र तक्रार पोर्टल
तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि तक्रारीचा विषय स्पष्टपणे नमूद करावा.
आयुक्तांचा अन्न व्यावसायिकांना स्पष्ट इशारा!
अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ चे पालन करूनच व्यवसाय करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना निर्भेळ अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ही माहिती चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी कळविली आहे.




