सीईओंच्या आदेशाला केराची टोपली? महिला सचिव भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल सात दिवसांनंतरही सादर नाही!
कोरपना: कातलाबोडी येथील ग्रामपंचायत सचिव (महिला) यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी चौकशी करून अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे परिपत्रक काढूनही निश्चित मुदत उलटून गेल्यानंतरही अद्याप चौकशी अहवाल सादर झालेला नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरपंच विजय धानोरकर यांनी ग्रामपंचायत कातलाबोडी येथिल महिला सचिव यांच्या विरोधात गंभीर आर्थिक अनियमितता आणि कामकाजात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सीईओ महोदयांनी तातडीने चौकशी समिती नेमून सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु, सीईओंच्या थेट आदेशालाही जुमानले गेले नसल्याचे चित्र दिसत आहे. मुदत उलटून गेल्यानंतरही चौकशी अहवाल सादर न झाल्यामुळे, या प्रकरणाच्या चौकशीवर आणि संबंधितांवर कुणाचे तरी ‘अदृश्य’ राजकीय किंवा प्रशासकीय दबाव आहेत की काय, असा संशय व्यक्त होत आहे.
सरपंचांनी या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली असून, सीईओ यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होत असून, दोषींवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या प्रकरणातील सत्य कधी बाहेर येणार आणि अहवाल कधी सादर होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






