जिवतीमध्ये स्मार्ट मीटरचा वाद पेटला; विद्युत विभागाच्या मनमर्जीविरोधात ‘वीरगिरी’ आंदोलनाचा इशारा!
जिवती: तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार सध्या शिगेला पोहोचला असून, सामान्य ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात आता संताप व्यक्त होत असून, सय्यद शब्बीर सय्यद नुरुद्दीन या संतप्त ग्राहकाने १० एप्रिल २०२६ रोजी थेट मोबाईल टॉवरवर चढून ‘वीरगिरी’ आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
सय्यद शब्बीर यांच्या घरात आधी साधे डिजिटल मीटर बसवलेले होते. मात्र, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता किंवा पूर्वसूचना न देता, घरात स्मार्ट मीटर बसवले. राज्य सरकारने घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर अनिवार्य नसल्याचे संकेत दिले असतानाही, स्थानिक अधिकारी मात्र स्वतःच्या मनमर्जीने हे मीटर बसवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन?
निवेदनात नमूद केल्यानुसार:
दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील बैठकीत स्पष्ट केले होते की, सामान्य घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्यासाठी त्यांची ‘ना हरकत’ (NOC) असणे आवश्यक आहे.
असे असतानाही, जिवती येथील विद्युत विभागाने या नियमांना केराची टोपली दाखवत परस्पर मीटर बदलले.
”मी संबंधित अधिकारी जयस्वाल यांना वारंवार विनंती केली की, माझे स्मार्ट मीटर काढून जुनेच डिजिटल मीटर लावून द्यावे. मात्र, त्यांनी माझ्या विनंतीकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच मला आता आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलवे लागत आहे.”
— सय्यद शब्बीर (पीडित ग्राहक)
प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम
सय्यद शब्बीर यांनी जिवतीचे तहसीलदार, उपअभियंता (विद्युत पुरवठा) आणि पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन खालील इशारा दिला आहे:
येत्या चार दिवसांत स्मार्ट मीटर काढून साधे डिजिटल मीटर लावावे. मागणी पूर्ण न झाल्यास १० एप्रिल २०२६ रोजी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार.
आंदोलनादरम्यान जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी जयस्वाल यांना सर्वस्व जबाबदार धरण्यात यावे.
आता या इशाऱ्यानंतर विद्युत विभाग नमते घेणार की आंदोलनाचे हे ‘नाट्य’ अधिक पेटणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






