खाकीच्या नाकाखाली ‘विना नंबर’चा थरार; अपघातानंतरही पोलीस सुस्त की मस्त?
तक्रार होऊनही कारवाई शून्य; कोरपना पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे धुके!
कोरपना: कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटसमोरच जेव्हा एखादा अपघात होतो आणि त्यानंतरही प्रशासन डोळे मिटून बसते, तेव्हा ‘सामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे?’ असा संतप्त सवाल आता कोरपनावासीय विचारत आहेत. विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने धुमाकूळ घालूनही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गत १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास कोरपना पोलीस स्टेशनच्या अगदी समोर पाण्याचा टँकर असलेल्या एका ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. हे ट्रॅक्टर भरवस्तीत पलटी झाले. सुदैवाने यात कोणाचा जीव गेला नाही, मात्र या घटनेने सार्वजनिक सुरक्षेचे धिंडवडे काढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या ट्रॅक्टरवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती.
पोलीस आणि आरटीओचे ‘अर्थपूर्ण’ मौन?
विना नंबरचे वाहन रस्त्यावर धावतेच कसे? हा पहिला प्रश्न. आणि अपघात झाल्यावरही तीन-चार दिवस उलटूनही मालकाचा पत्ता लागत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाहनाचा विमा (Insurance) देखील संपलेला आहे. तरीही पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभागाने अद्याप कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत.
एकावर मेहेरबानी, दुसऱ्यावर कारवाई?
विशेष म्हणजे, १६ एप्रिल रोजी पोलीस अंमलदार लक्ष्मण नुनुंचे यांनी हयगयीने गाडी चालवणाऱ्या एका दुचाकीस्वारावर (कलम २८१ बी.एन.एस. अन्वये) गुन्हा दाखल केला. मग तोच न्याय पोलीस स्टेशनसमोर अपघात करणाऱ्या ‘त्या’ बेवारस आणि विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरला का लावला जात नाही? असा रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत.
चर्चेतील ‘शेती उपयोगी’ वाहनाचा आडोसा
सदर वाहन हे शेती कामासाठी वापरले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, शेती कामाच्या नावाखाली विना परवाना, विना विमा आणि विना नंबर प्लेटची वाहने लोकांच्या जीवाशी खेळणार असतील, तर त्याला जबाबदार कोण?
त्या विना नंबर ट्रॅक्टर मालकाचा तातडीने शोध घ्यावा.
सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरटीओने कडक दंड आकारावा.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ एफआयआर (FIR) दाखल करावा.
जर तातडीने कारवाई झाली नाही, तर कोरपना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. आता चेंडू पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या दरबारात आहे.






