कृषी बिलासाठी थेट ४० हजारांची लाच! कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; गडचांदूरमधील खळबळजनक कारवाई
चंद्रपूर / गडचांदूर / कोरपना : ✍️ मोहब्बत खान
शेतकऱ्यांच्या हक्काच्या कृषी बांधकामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपणा) या भ्रष्ट अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), वर्धाच्या पथकाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. गडचांदूर येथील एका बार अँड रेस्टॉरंट’ समोरील मोकळ्या जागेत २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांच्या ओळखीच्या ठेकेदाराच्या माध्यमातून कोरपना तालुक्यातील तळोधी शिवार येथे कृषी विभागांतर्गत मिश्रित गॅबियन बंधाऱ्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे प्रलंबित बिल काढण्याच्या मोबदल्यात सहायक कृषी अधिकारी हरी उदगीरे याने सुरुवातीला ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रुपये आधीच उकळण्यात आले होते, तर उर्वरित ५५ हजार रुपयांसाठी आरोपी अधिकारी सातत्याने तगादा लावत होता.
लाच देण्याची अजिबात इच्छा नसलेल्या त्रस्त तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), वर्धा गाठून याप्रकरणी लिखित तक्रार नोंदवली.
पडताळणी आणि एसीबीचा यशस्वी सापळा
तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीच्या पथकाने २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते.
नियोजनानुसार, २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी गडचांदूर येथील एका शाळेसमोरून आरोपी हरी उदगीरे याने तक्रारदाराला कोरपना रोडवरील एका बारजवळ बोलावून घेतले. तिथे पिवळ्या रंगाच्या पिशवीत ५०० रुपयांच्या ८० नोटा म्हणजेच एकूण ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच, आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला सायंकाळी १७:५५ वाजता रंगेहाथ ताब्यात घेतले.
अधिकारी पळून जाण्याच्या प्रयत्नात, पण…
कारवाईदरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताच आरोपी हरी उदगीरे याने पंचांसमोर सहकार्य न करता पिशवी खाली फेकून दिली आणि पथकासोबत जोरजबरदस्ती व आरडाओरड करत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क एसीबी पथकाने प्रसंगावधान दाखवत शिताफीने त्याला जागीच जेरबंद केले.
झडतीदरम्यान अल्ट्राव्हायोलेट लॅम्पच्या (Ultraviolet Lamp) प्रकाशात तपासणी केली असता, आरोपीच्या बोटांवर अँन्थ्रासिन पावडरची निळसर-पांढरी चकाकी स्पष्टपणे दिसून आली. तसेच त्याच्याकडून लाचेची रक्कम असलेली पिशवी, एक विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल फोन व ५९५ रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-१९८८ (कलम ७) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत.
ही धडक कारवाई ला.प्र.वि. वर्धाचे पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे, पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे व विष्णू काळुसे यांच्या पथकाने पार पाडली. कृषी विभागातील या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
👉 जनतेस आवाहन: कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) तात्काळ संपर्क साधावा.




