Sunday, November 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ३४ लाख ५३ हजारांची फसवणूक? चंद्रपुरात खळबळ!

नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ३४ लाख ५३ हजारांची फसवणूक? चंद्रपुरात खळबळ!

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी; पाच सोन्याच्या बांगड्याही गहाण ठेवल्याचा आरोप! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

चंद्रपूर : सरकारी नोकरी मिळविण्याच्या आशेने अनेक तरुण धडपडत असतात. याच आशेचा गैरफायदा घेत पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ३४ लाख ५३ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त प्रथम माहिती अहवालानुसार, तक्रारदार यशमीत बागे यांचा भाजीपाला व्यवसाय असून, त्यांची गंजवाड भाजी मार्केट परिसरात ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपी केतन विजय जोरगेवार याने जानेवारी २०२४ मध्ये नागपूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.

या कामासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सेटिंग असल्याचे सांगत वेळोवेळी तक्रारदाराकडून रोख रक्कम, फोन-पे आणि धनादेशाद्वारे पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

३४ लाखांहून अधिक रक्कम दिल्याचा दावा!

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २ जानेवारी २०२४ पासून विविध तारखांना पैसे देण्यात आले. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार आणि धनादेशांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ३४ लाख ५३ हजार ६०० रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, नोकरीचे आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट पैसे परत मागितल्यानंतरही टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सोन्याच्या पाच बांगड्या गहाण ठेवल्याचाही आरोप!

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा तक्रारदाराच्या पत्नीच्या सोन्याच्या पाच बांगड्या गायब असल्याचे निदर्शनास आले. संशयावरून चौकशी केली असता, संबंधित सोन्याच्या बांगड्या मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

आरोपीने सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याची कबुली दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

१६ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन?

तक्रारीनुसार, संपूर्ण ३४ लाख ५३ हजार ६०० रुपयांपैकी १६ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांची मुदत मागूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी केतन विजय जोरगेवार, पायल विजय जोरगेवार आणि रिमा विजय जोरगेवार यांची नावे प्रथम माहिती अहवालात नमूद आहेत.

दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक १०८२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दादाजी निखाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सरकारी नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना आळा बसणार कधी?

सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचे प्रकार समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय आहेत. बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये. या प्रकरणातील पैशांचा व्यवहार, कथित नोकरीचे आमिष, सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार आणि संबंधित आर्थिक पुरावे यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

आता या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात आणि तक्रारदाराला त्याची रक्कम परत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाची संपादकीय टीप : वरील वृत्त हे उपलब्ध एफआयआर व तक्रारदाराच्या जबाबावर आधारित आहे. नमूद आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Popular Articles

error: Content is protected !!