ना हरकत प्रमाणपत्राच्या नावाखाली ५ लाखांची मागणी; ३ लाखांच्या सापळ्यात दोन्ही अधिकारी अडकले!
२ लाख ८० हजारांच्या बनावट नोटा, २० हजारांच्या खऱ्या नोटा; एफआयआरमधून लाचखोरीच्या प्रकरणातील धक्कादायक तपशील उघड
विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
वरोरा (जि. चंद्रपूर) : शासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या नावाखाली तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणाने वरोरा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून पकडले. या प्रकरणात पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील वरोरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक १०८६/२०२६ मधून लाच मागणीपासून ते सापळा कारवाईपर्यंतचे अनेक महत्त्वपूर्ण तपशील समोर आले आहेत.
एफआयआरमधील माहितीनुसार, मौजा नागरी येथील सर्व्हे क्रमांक १९८/२ मधील ०.८१ हेक्टर क्षेत्रावर बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी संबंधितांनी उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे अर्ज केला होता. या बांधकामासाठी ग्रामपंचायत नागरीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.
याच प्रमाणपत्राच्या कामासाठी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग निलकंठ पेंदे (वय ४८) आणि पंचायत समिती वरोरा येथील प्रशासक तथा विस्तार अधिकारी प्रणव सुधाकरराव बक्षी (वय ५१) यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. मौजा खांबाडा परिसरात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील रहीम पानठेल्याजवळ ही कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांना पकडण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
३ लाखांच्या रकमेत २.८० लाखांच्या बनावट नोटा?
या कारवाईतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे सापळ्यासाठी वापरण्यात आलेल्या रकमेचा तपशील. एफआयआरनुसार, एकूण तीन लाख रुपयांपैकी २० हजार रुपये खऱ्या चलनी नोटा, तर दोन लाख ८० हजार रुपये खेळण्यातील नोटा (बनावट चलनी नोटा) होत्या.
एसीबीने या कारवाईदरम्यान मोबाईल फोन, मेमरी कार्ड, संबंधित कागदपत्रे आणि दुचाकीसह अन्य साहित्यही जप्त केल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित सन २०१८) मधील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशिनाथ मोरे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
‘ना हरकत’च्या नावाखाली लाचेचा बाजार कधी थांबणार?
सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये आपली कामे करून घेण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. मात्र, एखादे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लाखोंची मागणी होत असल्याचा आरोप समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याचेही नाव समोर आल्याने ग्रामपंचायत ते पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता या प्रकरणाच्या सखोल तपासातून लाच मागणीमागील संपूर्ण साखळी उघड होणार का? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच संबंधित ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत नेमके काय घडले होते? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात एक महत्त्वपूर्ण संदेश गेला असला, तरी केवळ सापळा कारवाईपुरते मर्यादित न राहता शासकीय कामकाजातील लाचखोरीच्या प्रवृत्तीवर कायमस्वरूपी अंकुश बसणे गरजेचे आहे.




