Sunday, November 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

बिनानंबर प्लेटच्या भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू!

बिनानंबर प्लेटच्या भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू!

गोंडपिपरी–आष्टी मार्गावरील भीषण अपघात; २२ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

गोंडपिपरी |

गोंडपिपरी तालुक्यातील गोंडपिपरी–आष्टी मार्गावर भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त दुचाकीला नंबर प्लेट नसल्याची बाब पोलीस एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस एफआयआरमधील माहितीनुसार, रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.४५ वाजताच्या दरम्यान गोंडपिपरी ते आष्टी मार्गावरील कन्यका राईस मिलसमोर, सुरगाव परिसरात हा अपघात घडला.

विठ्ठलवाडा गावाकडून गोंडपिपरीच्या दिशेने पायी येत असलेल्या एका तरुणाला गोंडपिपरीकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकला गेला. तर पादचारी तरुणही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना मदत केली. दुचाकीस्वार व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला खासगी वाहनाने नातेवाइकांनी नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पादचाऱ्याला पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणातील मृत तरुणाची ओळख सुरुवातीला पटली नसल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दुचाकी चालकाचे नाव सधर्म धनतीन काकडे (वय २२, रा. विठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) असे असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवाजी विठोबाजी निखाडे करीत आहेत.

बिनानंबर प्लेटची वाहने आणि भरधाव वेगाचा प्रश्न ऐरणीवर!

या अपघातामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या विनानंबर प्लेटच्या वाहनांचा तसेच बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनांना नंबर प्लेट नसणे, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अशा वाहनांची तपासणी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

अपघातातील मृत व्यक्तीला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular Articles

error: Content is protected !!