Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

आजपासून कोरपना दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचारी बेमुदत संपावर!

आजपासून कोरपना दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचारी बेमुदत संपावर!

न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता; प्रलंबित वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार

कोरपना: राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कोरपना येथेही उमटले आहेत. आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाणी व फौजदारी न्यायालय, कोरपना येथील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या २१ महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस मंजुरी दिली होती. त्याच धर्तीवर दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतनवाढ लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने प्रस्ताव तयार करून मुख्य न्यायमूर्तींच्या मंजुरीनंतर ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे पाठविला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नाही.

या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेने १६ ऑगस्ट २०२६ रोजी संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तसेच सुमारे पाच हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. न्यायिक अधिकारी संघटनेसह अनेक लोकप्रतिनिधींनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

कोरपना न्यायालयातील कामकाजाकडे नागरिकांचे लक्ष!

आजपासून कोरपना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने विविध न्यायालयीन कामांसाठी येणारे पक्षकार, वकील आणि नागरिक यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः सुनावणी, प्रशासकीय कामकाज आणि न्यायालयाशी संबंधित विविध प्रक्रियांवर याचा कितपत परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाने मागण्यांची दखल घेऊन तोडगा काढावा!

न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा प्रशासकीय कणा असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन संपावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या पक्षकारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Popular Articles

error: Content is protected !!