Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

नारंडा येथे ट्रकांचा महापूर; नागरिकांचे जगणे झाले मुश्कील!

नारंडा येथे ट्रकांचा महापूर; नागरिकांचे जगणे झाले मुश्कील!

दालमिया सिमेंट कंपनीसमोर शेकडो ट्रकांचा बेकायदेशीर ठिय्या!

वाहतूक कोंडी, धुळीचा विळखा आणि अपघातांचा वाढता धोका; प्रशासन मात्र गप्प?

कोरपना | प्रतिनिधी

कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीसमोर अवजड ट्रकांचा अक्षरशः महापूर आला असून, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो सिमेंट बल्कर आणि डंपर तासनतास उभे राहत आहेत. यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांना रोजच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्ताच ट्रकांच्या पार्किंगमध्ये बदलल्याने दुचाकी, रिक्षा, शालेय बस आणि इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिमेंट वाहतुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषणामुळे संपूर्ण परिसर धुरकट बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर आडवे-तिडवे उभे असलेले ट्रक आणि अपुऱ्या प्रकाशामुळे रात्री अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलासारख्या अत्यावश्यक सेवांनाही वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

👉 दालमिया कंपनीने तातडीने स्वतंत्र ट्रक टर्मिनस उभारावा.

👉 मुख्य रस्त्यावर उभ्या ट्रकांवर RTO व पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

👉 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी.

विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार असतील, तर त्याचा उपयोग काय? नारंडा येथील ट्रकांच्या या गंभीर समस्येवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन नेमकी कोणती ठोस भूमिका घेणार, याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles