शेरज बु. येथे सार्वजनिक मंदिर परिसरात अतिक्रमणामुळे तणाव; ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध गावकऱ्यांचा संताप
✍️ मोहब्बत खान
कोरपना: तालुक्यातील मौजा शेरज बु. येथे पुरातन हनुमान मंदिर आणि माता मंदिर परिसरातील सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत समस्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अतिक्रमणामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असून गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमके प्रकरण काय?
गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेरज बु. येथे ग्रामपंचायत स्थापनेपूर्वीपासून सार्वजनिक हनुमान मंदिर व माता मंदिर आहे. ग्रामपंचायतीच्या २०१० ते २०१४ च्या नमुना ८ च्या रेकॉर्डनुसार, भाऊराव गोविंदा बावणे यांची मालमत्ता क्र. ७७ मध्ये ७०२ चौ. फूट जागेची नोंद आहे. मात्र, भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत तांत्रिक चूक झाल्याचा फायदा घेत, संबंधित वारसांनी (गुलाब बावणे व प्रेमसागर बावणे) ५०० चौ. फूट जास्तीची जागा आपल्या नावे नोंदवून घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मंदिर परिसरात शौचालय व पायऱ्यांचे बांधकाम
या वाढीव जागेचा आधार घेत संबंधित व्यक्तींनी मंदिराच्या परिसरात, जिथे गावकरी पूजा-अर्चा करतात, तिथे घराच्या पायऱ्या आणि शौचालय-बाथरूमचे बांधकाम सुरू केले आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी शौचालयाचे बांधकाम होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
या गंभीर विषयावर गावकऱ्यांनी सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी (BDO) आणि तहसीलदार यांना लेखी निवेदने दिली आहेत. परंतु, “गैरअर्जदार स्वतः सत्तेत आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असल्याने सरपंच व सचिव जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत,” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा
भविष्यात पोळा, दसरा, गणेशोत्सव आणि कीर्तन-भजनासारख्या धार्मिक कार्यक्रमांना या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होणार आहे. “जर हे बांधकाम तात्काळ थांबवून जागा खुली केली नाही, तर गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरपंच अरविंद भगवान तीरणकर आणि सचिव पोले हे सर्वस्वी जबाबदार राहतील,” असा इशारा स्वाक्षरीकर्त्या गावकऱ्यांनी दिला आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन हस्तक्षेप करून धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






