सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांचे धाबे दणाणले; तक्रारदारावर खालच्या पातळीवर टीका करणे अंगलट येण्याची शक्यता
कोरपना: शासनाच्या अंतोदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र व्यक्तींची नावे प्रशासनाने यादीतून वगळल्यामुळे आता नवा वाद उफाळून आला आहे. ही नावे कापली गेल्याचा राग मनात धरून काही अपात्र लाभार्थ्यांनी एका सार्वजनिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदाराविरुद्ध अत्यंत अभद्र आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली आहे. सामाजिक कार्यात खोडा घालण्याचा हा प्रयत्न आता या प्रवृत्तींना चांगलाच भोवणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अंतोदय योजना ही प्रामुख्याने अतिशय गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. मात्र, अनेक सधन आणि निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर प्रशासनाने कडक पावले उचलत चौकशीअंती अनेक अपात्र लोकांची नावे रेशन कार्डमधून कमी केली. यामुळे सरकारी तिजोरीची होणारी लूट थांबली असली, तरी ज्यांचे लाभ बंद झाले आहेत, त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.
आपले नाव योजनेतून का कमी झाले, याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी काही अपात्र लाभार्थ्यांनी समाजमाध्यमांचा गैरवापर सुरू केला आहे. एका स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदाराचा उल्लेख करून त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करण्यात आली. यामध्ये वापरण्यात आलेली भाषा अत्यंत खालच्या पातळीची असून, यामुळे तक्रारदाराच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न झाला आहे.
डिजिटल पुरावे आणि स्क्रीनशॉटच्या आधारे आता या प्रकरणाची तक्रार पोलीस प्रशासनाकडे करण्याची तयारी सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी करणे किंवा अभद्र भाषा वापरणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे प्रशासकीय कारवाईनंतर आता या ‘अपात्र’ महाभागांना न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शासकीय कामात पारदर्शकता आणणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे धमकावणे किंवा त्यांचा अपमान करणे, हे लोकशाहीला घातक असून अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
- विशेष प्रतिनिधी, कोरपना एक्सप्रेस






